उरण : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती व्हावी या उद्देशाने उरण वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने परिसरातील ठिकठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. देशाभरातील वाढत्या अपघातांमध्ये तरुणांचे मृत्यू पावण्याची संख्या चिंताजनक आहे. नियमांना बगल देत युवकांमध्ये वाहने वेगाने चालविण्याची क्रेझ आहे.वेगावर नियंत्रण नसल्यामुळेच अपघात आणि त्यामध्ये मृत्यू पावण्याची संख्या वाढतच चालली आहे.यावर जनजागृती करुन नियंत्रण ठेवण्यासाठी देशभरात राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येते. याच जनजागृती मोहीमे अंतर्गत पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी उरणमध्येही राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान मोहिमेत अंतर्गत जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती.
उरण वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने उपनिरीक्षक संजय पवार यांच्या पथकाने परिसरातील ठिकठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले.परिसरातील चारफाटा, पालवी नाका, शहरात राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात अनेक वाहन चालकांना नियमांची माहिती करून दिली. मोटार सायकल स्वारांनाही हेल्मेटचे महत्व समजावून सांगण्यात आले.