कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते ॲड. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण झाले असून या स्मारकाचे लोकार्पण २० फेब्रुवारीला व्हावे, अशा मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांना दिले. लोकार्पण सोहळ्यास ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, शाहू छत्रपती, भाकपचे नेते खासदार डी. राजा, विचारवंत व अभिनेते प्रकाश राज यांना निमंत्रित करण्याची तयारी भाकपने केली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
ज्येष्ठ कामगार नेते ॲड. गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी समाजकंटकांनी भर रस्त्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये २० फेब्रुवारी त्यांचा मृत्यू झाला. कोल्हापुरात झालेल्या सर्वपक्षीय सभेत गोविंद पानसरे यांचे उचित स्मारक उभारण्याचे ठरले होते. त्यानुसार महापालिकेच्या महासभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने पानसरे यांच्या स्मारकाचा ठराव मंजूर केलेला होता. आता त्या स्मारकाचे काम पूर्ण होत आले आहे. स्मारकाचा लोकार्पण सोहळा २० फेब्रुवारी रोजी करण्यात यावा अशी मागणी भाकपच्या शिष्टमंडळाने केली. स्मारकसाठी महापालिकेने 25 लाख तर आमदार सतेज पाटील यांनी डी.पी.डी.सी मधून 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे.