AASHA BHOSALE : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. त्यांची गाणी म्हणजे संगीतसृष्टीला मिळालेलं वरदानच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. वयाच्या १० व्या वर्षापासूनच आशा भोसले यांनी संगीत शिकायला सुरुवात केली. पुढच्या महिन्यात ८ तारखेला आशा भोसले आपला ९० वा वाढदिवस साजरा करणार आहेत. या दिवशी त्यांचे दुबईत कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत आशा भोसले यांनी ‘मी फिल्मइंडस्ट्रीतील शेवटची मुगल आहे’ असं विधान केलं. ८ सप्टेंबर रोजी आशा भोसले ९० वर्षांच्या होणार आहेत. याही वयात स्टेजवर सलग तीन तास परफॉर्म करण्याचा उत्साह त्यांच्यात आहे. वाढदिवसानिमित्त त्यांची दुबईत कॉन्सर्ट होणार आहे.
मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेनिमित्त आशा भोसले म्हणाल्या,’फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास आज फक्त मला माहित आहे. प्रत्येकाचं आयुष्य माहित आहे. दिग्दर्शक, निर्माता, आर्टिस्ट, गायक सगळ्यांना मी ओळखते. जर मी सांगत बसले तर ३ ४ दिवस लागतील इतक्या गोष्टी आहेत. सगळं माझ्या मनात येतं मी काहीच विसरलेले नाही. मी शेवटची मुघल आहे…या फिल्मलाईनची मी शेवटची मुघल आहे.’ आशा भोसले यांचं हे विधान आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जुनी गाणी आज रिमिक्स केली जात आहेत याचं वाईट वाटत नसल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. आजच्या पिढीला तेच आवडतं. आम्हाला तर एक ना दिवस जायचंच आहे. पण नवीन पिक चांगलं आलं पाहिजे. त्यांनी विचार केला पाहिजे की आपण कुठून येतो. आपल्या परंपरा काय आहेत. तेव्हाच त्यांचं संगीत अजरामर होईल, असंही त्या म्हणाल्या. आशा भोसले या सध्याच्या पिढीसाठी प्रेरणा आहेत. संगीतावरील प्रेम, निष्ठा त्यांनी जपली. नव्या पिढीला त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. याही वयात त्यांच्यात तरुणांसारखा उत्साह आहे. लवकरच ९० व्या वर्षात पदार्पण करण्यासाठी त्या सज्ज आहेत.