ठाणे : ‘काही मुंबईकरांनी त्यांच्या भागातील जुन्या इमारतीचं पुनर्विकास होत असल्यामुळे शहर सोडलं आहे. तर काही मुंबईकरांना त्यांच्या घरांची कामे रखडल्याने त्यांना मुंबईनजीक भागात स्थलांतरीत व्हावं लागलं आहे. या मुंबईकरांना मुंबईत पुन्हा आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री उशिरा ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी ठाणे, जोगेश्वरी, विक्रोळी आणि धारावी येथील कार्यकर्ते आणि काही माजी नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मुंबईतील अनेक भागातील इमारती आणि जुन्या घरांच्या पुनर्विकासाचे काम रखडले आहे. मुंबईतील पुनर्विकासाचे काम रखडल्याने अनेक मुंबईकरांना स्थलांतर व्हावे लागले आहे. या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याचं प्राधान्य सरकारचं आहे. आमचं सरकार हे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने काम करत आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवनमान सुधारण्याचं काम सरकार करत आहे’.
तत्पूर्वी, ‘ मुंबईत नाले सफाईच्या कामामुळे बऱ्याच भागात यंदा पावसाळ्यात पाणी साचले नाही, असाही दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. ‘जेव्हा एखादा मुख्यमंत्री फिल्डवर असतो, तेव्हा पालिकेचे सर्वच कर्मचारी चांगला निकाल देण्यासाठी सज्ज होतात. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याचं काम मी हाती घेतलं आहे. यंदा पावसाळ्यात अनेक भागात पाणी साचले नसल्याने आमच्या प्रयत्नांना यश आलं आहे, असेही ते म्हणाले . दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. गेल्या वर्षी मुंबईत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केलेल्या ३००० कोटी रुपयांहून अधिक केलेल्या खर्चावर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला.