नवी मुंबई : एपीएमसी बाजारात घडलेल्या अग्नितांडवात मोठ्या प्रमाणात एपीएमसीतील गाळ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाने अग्नी अहवाल तयार केला होता. त्या अहवालात बाजारातील अतिक्रमण, गाळ्यांव्यतिरिक्त सामायिक जागेचा अतिरिक्त वापर यामुळे आगीच्या घटना घडत असल्याचा ठपका ठेवला होता. यादरम्यान एपीएमसी फळ बाजारात सामायिक जागेचा अतिरिक्त वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
जानेवारी ते मे महिन्यात आतापर्यंत १७० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजार समितीत जानेवारीनंतर आंबा, कलिंगड, पपई इत्यादी फळांचा हंगाम सुरू होतो. विशेषत: हापूसचा हंगाम सुरू झाला असून,बाजारात मोठ्या प्रमाणात लाकडी पेट्या दाखल होत आहेत. आगीची घटना घडली त्यावेळी मोठ्या प्रमाणात पुठ्ठे, गवत आणि लाकडी पेट्या होत्या. त्यामुळे आगीचे लोळ लांबपर्यंत पसरले होते तर २५-३० गाळ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रशासनाने गाळ्यांव्यतिरिक्त सामायिक जागेचा वापर तसेच मालधक्क्यांवर गाडी उभी करून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारीत ५४ , फेब्रुवारी मध्ये ७३, मार्चमध्ये ३०, एप्रिलमध्ये१२, तर मे महिन्यात आतापर्यंत एका व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली आहे.