मुंबई : चेंबूर परिसरात नाकाबंदी दरम्यान एका मोटारगाडीत पोलिसांना चाळीस लाखांची रोकड मिळाली. याप्रकरणी, टिळकनगर पोलिसांनी रोकड आणि मोटारगाडी चालकाला ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे. यानुसार, चेंबूरच्या पेस्टम सागर परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू होती. तेव्हा याठिकाणी एक मोटारगाडी आली. या गाडीबाबत पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तत्काळ गाडी बाजूला घेण्यास सांगितली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये पोलिसांना चाळीस लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. या रक्कमेबाबत चालकाने योग्य माहिती न दिल्याने टिळकनगर पोलिसांनी रोकड आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस आणि निवडणूक अधिकारी अधिक तपास करीत आहेत.