पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना पुण्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी १३८ कोटी रुपये किमते सोने जप्त केले आहे. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाका बंदीदरम्यान पोलिसांनी एका ट्रकमधून हे सोनं जप्त केलं आहे. सातारा रस्त्यावर आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान पैशांची मोठ्या प्रमात उलाढाल होत असताना पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. यासंदर्भात निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात आणि पैशांचा व्यवहार होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. उमेदवारांनी मतदरांना कोणत्याही प्रकारे पैशांचे आमिष दाखवू नये असे निवडणूक आयोगाने आधीच बाजावले आहे. असे असताना निवडणूक आयोग सतर्क आहे. अशात पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना १३८ कोटी रुपायांचे सोने सापडले आहे. प्राथमिक माहितीनुसार डिलिव्हरी ट्रान्सपोर्टचे हे सोने असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आचारसंहिता लागू झाल्याने अनेक ठिकाणी नाकाबंदी :
राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्याने अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ठिकठकाणी पोलिसांकडून संशयीत वाहनांची तापासणी केली जात आहे. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पाऊले उचलली जात आहेत. असे असताना पुण्यात १३८ कोटींचे सोने सापडल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. हे सोनं कुठून आलं, कुठे नेलं जात होतं आणि ते कोणाचं आहे याचा तपास पोलीस करत आहेत.