ठाणे प्रतिनिधी : ठाण्यातील मुंब्रा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ३० वर्ष जुन्या सदनिकेतील छताचे प्लास्टर अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर आई, वडील आणि भाऊ हे गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे. तसेच इमारतीच्या दर्जाचा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. मुंब्रा येथील जीवन बाग परिसरात ही घटना घडली. उनेजा शेख असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेत उनेजाचे आई-वडील व भाऊ जखमी झाले आहेत. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथे जीवन बाग परिसरात बानु टॉवर ही इमारत आहे. ही इमारत पाच मजली आहे. तसेच ही इमारत ३० वर्ष जुनी आहे. तब्बल २० सदनिका असलेल्या या इमारतीत सहा दुकाने देखील आहेत. इमारतीच्या खालच्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये उनेजा व तिचे वडील उमर शेख (वय २३), व आई मुस्कान (वय २१) व भाऊ इजान (१ वर्ष) हे राहतात.
रविवारी रात्री ८ च्या सुमारास अचानक स्वयंपाक घरातील छताचे प्लास्टर कोसळले. यावेळी उनेजा ही आईला मदत करत होती. तर तिचे आई वडील देखील त्या ठिकाणी होते. अचानक छताचे मोठे प्लास्टर अंगावर पडल्याने उनेजा व तिचे आई वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांना शेजाऱ्यांनी दवाखान्यात भरती केले. डॉक्टरांनी उनेजा हिला तपासले असता त्यांनी तिचा मृत्यू झाल्यचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व मुंब्रा पोलीस घटनास्थळी आले. इमारत सी-२ बी (इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे) या प्रवर्गात येत असल्याने या इमारतीमधील रहिवाशांना या इमारतीच्या दुरुस्तीच्या सूचना यापूर्वी दिल्या होत्या. मात्र, अद्याप या इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील रहिवासी जीव धोक्यात घालून येथे राहतात.