नवी मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार गणनाअर्ज (Enumeration Form) सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. ३० जूनपासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेला यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, १७ ऑगस्ट हीच अंतिम मुदत असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, या कालावधीत संबंधित मतदान केंद्र अधिकारी (BLO) यांच्याकडे गणनाअर्ज जमा न करणाऱ्या मतदारांचे नाव प्रारूप मतदार यादीतून वगळले जाणार आहे. त्यानंतर मतदारयादीत पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित नागरिकांना फॉर्म-६ भरून संपूर्ण प्रक्रिया नव्याने पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी ही बाब गांभीर्याने घेऊन वेळेत गणनाअर्ज भरून तो आपल्या भागातील बीएलओकडे जमा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गणनाअर्ज भरताना सन २००२ च्या मतदारयादीत स्वतःचे किंवा पालकांचे नाव आढळले नाही, तरीही अर्ज नाकारला जाणार नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी गणनापत्रातील कॉलम क्रमांक ३ मध्ये आपली सध्याची माहिती भरून स्वाक्षरी करावी आणि निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या कागदपत्रांपैकी एक आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज संबंधित बीएलओकडे सादर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि गणनाअर्ज संकलनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार शनिवार आणि रविवार, म्हणजेच ८ व ९ ऑगस्ट २०२६ रोजीही विशेष एसआयआर शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. एकूण १७९ ठिकाणी ही विशेष शिबिरे सुरू असून, नागरिकांना त्यांच्या भागातील शिबिरांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच १५० ऐरोली आणि १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघांमध्येही विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः १५० ऐरोली मतदारसंघातील ज्या मतदान भागांमध्ये गणनाअर्ज संकलन आणि डिजिटल नोंदणीचे प्रमाण कमी आहे, त्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत विशेष शिबिरे भरविण्यात येत आहेत. कामानिमित्त दिवसभर बाहेर असलेल्या नागरिकांना या अतिरिक्त वेळेत अर्ज भरून बीएलओकडे जमा करता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. प्रशासनाने सर्व पात्र मतदारांना अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह गणनाअर्ज सादर करून मतदारयादीतील आपले नाव कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
