ठाणे : पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी ठाणे जिल्ह्यात व्यापक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच वर्षांखालील सुमारे १ लाख ९७ हजार ६९४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्तपणे नियोजन केले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी जिल्हाभरात १,८७८ लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत. बूथवरील कामकाजासाठी ४ हजार ३४८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ३७४ पर्यवेक्षक संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहेत. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष घरभेट मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये १,३४७ पथके कार्यरत राहणार आहेत.
जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ६९ हजार ७७३ घरांना भेटी देण्यासाठी ५ हजार ३२३ पथक-दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेवर २६३ पर्यवेक्षक देखरेख ठेवणार आहेत. बसस्थानके, रेल्वे स्थानके, तपासणी नाके तसेच स्थलांतरित नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून अशा भागांसाठी ६८ ट्रान्झिट पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यांच्यावर २७ पर्यवेक्षक नियंत्रण ठेवतील. याशिवाय दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण भागांमध्ये सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ८८ मोबाईल पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील ३६ आरोग्य संस्था सहभागी होणार असून ७६ वैद्यकीय अधिकारी तसेच ३४ जिल्हास्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षक संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवणार आहेत. लसींची गुणवत्ता कायम राखण्यासाठी ४ हजार २२५ कोल्ड चेन उपकरणे, १ हजार २९२ लस वाहक आणि ४ हजार ४७६ मार्कर पेन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रशासनाने पालकांना आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देऊन मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

