ठाणे : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा मिळावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून टंचाईग्रस्त ३९ गावे आणि १२७ पाडे अशा एकूण १६६ लोकवस्त्यांसाठी ४० पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे ५८ हजार ४४३ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या तालुक्यांमध्ये सध्या गंभीर पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झालेली नसून तेथे टँकरची आवश्यकता भासलेली नाही. मात्र, भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मुरबाड तालुक्यातील ६ गावे आणि १० पाड्यांमधील ५ हजार ६६६ नागरिकांसाठी ३ शासकीय आणि ३ खाजगी अशा एकूण ६ टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. तर सर्वाधिक फटका बसलेल्या शहापूर तालुक्यातील ३३ गावे आणि १२७ पाड्यांमधील ५२ हजार ७७७ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ३७ खाजगी टँकर तातडीने कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण ४० टँकरपैकी तब्बल ३७ टँकर शहापूरमध्ये तैनात करून प्रशासनाने दुर्गम भागातील नागरिकांप्रती संवेदनशीलता दाखवली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून टँकरच्या फेऱ्या, वितरण आणि पाणीपुरवठ्याचे संनियंत्रण डिजिटल प्रणालीद्वारे केले जात आहे. १८ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या या व्यवस्थेमुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळत असून पाणीटंचाईच्या संकटावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

