पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी महानगरपालिकेने १५ ऑगस्ट २०२६ पासून घनकचरा व्यवस्थापन नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार घरगुती तसेच व्यावसायिक आस्थापनांमधून निर्माण होणारा कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य (डोमेस्टिक हॅझर्डस) अशा चार प्रकारांत विलगीकरण करूनच महापालिकेच्या घंटागाडीकडे द्यावा लागणार आहे. नियमांचे पालन न करता मिसळलेला कचरा देणाऱ्यांकडून १५ ऑगस्टपासून घंटागाड्यांमार्फत कचरा स्वीकारला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून, नागरिकांसह मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या सर्व आस्थापनांनाही हे नियम बंधनकारक असतील. घनकचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी महापालिकेने विकेंद्रित कचरा व्यवस्थापन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. त्याअंतर्गत शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे कचऱ्याची वाहतूक कमी होऊन स्थानिक पातळीवरच वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. तसेच लँडफिलवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करून पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रियेला चालना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या हॉटेल्स, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि इतर संस्थांसाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून, १५ ऑगस्टनंतर अशा आस्थापनांचा कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत उचलला जाणार नाही. संबंधित संस्थांनी त्यांच्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक राहणार आहे.
महापालिकेने नागरिकांना घरगुती कचरा चार प्रकारांत वर्गीकृत करूनच घंटागाडीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण झाल्यास त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणे, पुनर्वापराला प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे अधिक प्रभावीपणे शक्य होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. या उपक्रमाबाबत महापौर रवी लांडगे यांनी सांगितले की, “स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी पिंपरी-चिंचवड शहर घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कचरा विलगीकरण हा केवळ नियम नसून, शहराच्या भविष्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वीकारायची जबाबदारी आहे. महापालिकेच्या या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारावी.” तर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्यासाठी कचरा विलगीकरण हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहकार्य केल्याशिवाय प्रभावी घनकचरा व्यवस्थापन शक्य होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल.” याचवेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कचरा प्रक्रिया केंद्रे उभारून विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाला गती देण्यात येत असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असून, त्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल आणि प्रक्रिया अधिक प्रभावी होईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर आणि संस्थांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.
