मुंबई : महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य जहाजबांधणी आणि सागरी औद्योगिक केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. पालघर जिल्ह्यातील नांदगाव (वाढवण परिसर) येथे सुमारे ४,१५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक ‘युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम कॉम्प्लेक्स’ उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या सागरी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून महाराष्ट्र जागतिक मेरीटाईम हब बनण्याच्या दिशेने पुढे जाईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. पालघरमधील नांदगाव आणि दिघी येथे शिपयार्ड उभारणीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेडचे वेदांत चौधरी, अंबर आयडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डासमोर सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, वाढवणच्या आगामी खोल पाण्याच्या बंदराजवळ ६०० एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचे जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती, ड्राय डॉक, ऑफशोअर सेवा आणि ग्रीन शिप रिसायकलिंग केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलरची गुंतवणूक प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यातील काम पुढील दोन वर्षांत सुरू होणार आहे. प्रकल्पासाठी ३० वर्षांच्या नूतनीकरणीय भाडेपट्ट्यावर जमीन, मेगा प्रकल्पाचा दर्जा, सिंगल विंडो मंजुरी, भांडवली अनुदान आणि कौशल्य विकास सहाय्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र सागरी महामंडळ आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नांदगाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. हरित तंत्रज्ञान, रोजगार निर्मिती आणि स्थानिक विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांना राज्य सरकार प्राधान्य देणार असून महाराष्ट्राला ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये देशातील अग्रणी राज्य बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

