पुणे : विना परवाना श्वान व मांजर पाळू नये, असा नियम असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात फक्त ८१७ प्राणी मित्रांनी श्वान, तर ३२ जणांनी मांजर पाळण्याचा परवाना घेतला आहे. शहरात दहा हजारांहून अधिक प्राणी मित्रांकडे श्वान आणि मांजर असल्याचा अंदाज महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने केला आहे. त्यामुळे विना परवाना श्वान पाळणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. परवाना प्राप्त झाल्यापासून पुढील एक वर्षासाठी परवान्याची मुदत असते. त्यानंतर दर वर्षी परवान्याचे नूतनीकरण बंधकारक आहे. शहरात दहा हजारांहून अधिक पाळीव श्वान आहेत. प्रत्यक्षात केवळ ८१७ जणांकडेच श्वान पाळण्याचा परवाना आहे. त्यामुळे महापालिकेने विशेष मोहीम राबवून विना परवाना श्वान पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.
