ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला (कोपरी) होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी प्रवेशबंदी आणि नो पार्किंग धोरण लागू केली आहेत. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना लागू केली असून हे बदल कायमस्वरूपी राहणार आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सॅटीस पूल निर्माणाची कामे सुरु आहेत. या कामांमुळे येथील मार्गिका अरुंद झाली आहे. रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी देखील उभ्या केल्या जातात. त्यामुळे कोंडीत भर पडते. येथील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी काही मार्गांवर वाहने उभी करण्यास वेळेचे बंधन लागू केले आहे. तर काही ठिकाणी प्रवेशबंदी लागू केली आहे. पंजाब नॅशनल बँक ते महापालिकेचे अग्निशमन दल केंद्र मार्गाच्या डाव्या बाजूस १०० मीटर अंतरापर्यंत सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत उजव्या बाजूस परवानगी असले. अग्निशमनदल केंद्र राधाकृष्ण मंदिर मार्गाच्या डाव्या बाजूस ५० मीटर अंतरापर्यंत सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि उजव्या बाजूस दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहने उभी करण्यास मूभा असेल.

