मुंबई : बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (बीएसई) बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याची घटना ताजी असताना आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजलाही त्याच ई-मेल ॲड्रेसवरून धमकी आल्याचे निष्पन्न झाले आहे. हा ई-मेल कॉम्रेड पिनाराई विजयन या नावाने पाठविण्यात आला आहे. इमारतीमध्ये चार आरडीएक्स व आईडी ठेवले असून त्याचा स्फोट होणार असल्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एनएसईच्या अधिकृत ई-मेल ॲड्रेसवर धमकीचा ई-मेल रविवारी आला होता. त्यात एनएसईच्या सर्व इमारतीमध्ये बॉम्ब ठेवला असून त्याचा बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी स्टॉक एक्सचेंजचे वरिष्ठ व्यवस्थापक कौशल कुमार यांच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५३(१) (ब), ३५१(३), ३५१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बीएसई व एनएसी यांना एकाच वेळी एकाच ई-मेल ॲड्रेसवरून धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले आहेत. त्यासाठी आऊटलूक ई-मेल ॲड्रेसचा वापर करण्यात आला आहे. हा खोडसाळपणा वाटत असून याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

