नवी मुंबई : परदेशातील कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका सायबर टोळीने वाशीत राहणाऱ्या एकास वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरण्यास सांगून त्यांच्याकडून तब्बल ११ लाख १० हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह अपहार तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार अमित अवस्थी (वय ५२) हे वाशी सेक्टर-१७ मध्ये राहण्यास असून त्यांना इंटरनॅशनल नोकरीची गरज असल्याने त्यांनी विविध ठिकाणी अर्ज केले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या मोबाईलवर मायकल जोसेफ नावाच्या सायबर चोरट्याने संपर्क साधून त्यांना सिंगापूर व इतर ठिकाणी जॉब मिळवून देतो, असे सांगितले.
त्यासाठी त्यांनी ६,१५० रुपये भरल्यावर दुसऱ्या एकाने नोकरी पक्की झाल्याचे सांगितले. त्यानंतर विविध कारणांसाठी १२ ते १६ जानेवारी या कालावधीत तब्बल ११ लाख १० हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर अवस्थी यांना आणखी एक लाख ३० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. ही रक्कम भरू शकत नसल्याने त्यांनी आपली रक्कम परत करण्यास सांगितले. मात्र, रक्कम मिळाली नाहीच, पुढे प्रतिसादही मिळेनासा झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.