मुंबई : राज्यातील कृषी, अन्नप्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थांवरील प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी वरुण बेव्हरेजेस लिमिटेडने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे २,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीअंतर्गत अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यामुळे सुमारे ५५० जणांना थेट रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि वरुण बेव्हरेजेस लिमिटेड यांच्यात या प्रकल्पासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आर्वी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामध्ये दैनंदिन वापरातील ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी), पेयपदार्थ, फळांचे ज्यूस तसेच कृषीमालावर आधारित अन्नप्रक्रिया उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम एप्रिल २०२७ पासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या गुंतवणुकीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनाला मूल्यवर्धनाची संधी मिळणार असून कृषीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा, पूरक व्यवसाय आणि स्थानिक आर्थिक व्यवहारांनाही मोठी चालना मिळेल. प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या, नोंदणी, मंजुरी, ना-हरकत प्रमाणपत्रे तसेच लागू असलेली वित्तीय प्रोत्साहने मिळवून देण्यासाठी राज्य शासन संबंधित विभागांच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे सहकार्य शासनाच्या विद्यमान धोरणे, नियम आणि विनियमांच्या अधीन राहून दिले जाणार आहे. सामंजस्य कराराच्या कार्यक्रमाला आमदार सुमित वानखेडे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, उद्योग आयुक्त कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या आयुक्त व व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचे मुख्य परिचालन अधिकारी तथा तांत्रिक विभागाचे समूहप्रमुख राजिंदर जीत सिंग बग्गा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यात उद्योगवृद्धीसोबतच कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
