वृत्तसंस्था : मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (लक्ष्या) पुन्हा एकदा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित ‘मिशन भाऊचा धक्का’ ही पहिली मराठी AI ॲक्शन शॉर्ट फिल्म २७ नोव्हेंबर २०२६ रोजी थेट यूट्यूबवर प्रदर्शित होणार आहे. ‘अँटेलियर फिल्म्स’च्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन यश मनोज सूर्यवंशी यांनी केले आहे. या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नसून, चाहत्यांसाठी विशेष फॅन-मेड शॉर्ट फिल्म म्हणून सादर केला जाणार आहे. आधुनिक AI तंत्रज्ञान आणि 3D ॲनिमेशनच्या मदतीने लक्ष्मीकांत बेर्डे यांची डिजिटल प्रतिमा (Digital Double) तयार करण्यात आली असून, त्यांच्या कारकिर्दीत कधीही न पाहिलेला दमदार ॲक्शन अवतार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज कलाकाराला नव्या तंत्रज्ञानातून पुन्हा अनुभवण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “लेजंड नेव्हर डायज”, “लक्ष्या पुन्हा पडद्यावर” अशा भावना व्यक्त करत अनेकांनी या चित्रपटाविषयी उत्सुकता दर्शवली आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करून दिवंगत कलाकारांना नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणण्याच्या प्रयत्नांना मराठी चित्रपटसृष्टीतही आता वेग येत असल्याचे या प्रकल्पातून दिसून येत आहे. दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही त्यांच्या आगामी ‘झपाटलेला ३’ चित्रपटात AI च्या सहाय्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आवाज किंवा भूमिका पुन्हा साकारण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे AI तंत्रज्ञानामुळे मराठी चित्रपटसृष्टीत नव्या प्रयोगांना चालना मिळत असून, भविष्यात अशा प्रकारचे आणखी प्रकल्प पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
