ठाणे : शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आरोपमुक्त होईपर्यंत मीनाक्षी शिंदे यांनी पदावरून बाजूला व्हावे, अशी जाहीर भूमिका मांडल्यानंतर अवघ्या २४ तासांत हा राजीनामा देण्यात आला. महिनाभरापूर्वी झालेल्या प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. या प्रकरणामुळे ठाण्यातील राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांकडून सरकार आणि सत्ताधारी पक्षावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनीही, माझ्यावर असे आरोप झाले असते तर चौकशी पूर्ण होईपर्यंत मी स्वतःहून पद सोडले असते, असे विधान करत नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश दिला होता. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी पक्षपदाचा राजीनामा देत राजकीय चर्चांना अधिक वेग दिला आहे.
एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या आपल्या राजीनामा पत्रात मीनाक्षी शिंदे यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात होत असलेले आरोप हे केवळ पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी रचलेले राजकीय षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाची प्रतिमा डागाळू नये, नेतृत्वावर अनावश्यक दबाव येऊ नये आणि चौकशीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी आपण अत्यंत व्यथित मनाने केवळ पक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्या ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून आपले काम सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केवळ राजीनामा पुरेसा नसून मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी कायम ठेवली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत न्यायाची मागणी केली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणाचा तपास, त्यावरील राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि त्यातून निर्माण झालेल्या घडामोडींवर राज्याचे लक्ष लागले असून, पुढील तपास आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
