नवी दिल्ली : भारताने भविष्यातील तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्याच्या विकासात जगाचं नेतृत्व करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत आयोजित इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह (ESTIC 2026) च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आता नव्या मानसिकतेने आणि आत्मविश्वासाने पुढे जात असल्याचं सांगताना, केवळ इतर देशांच्या शोधांमागे धावण्याचा काळ संपला असून आता भारताने स्वतः नवे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतासाठी, जगासाठी, आज आणि उद्यासाठी उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान निर्माण करणे हेच देशाचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. एआयमुळे नियमित कामांमध्ये गती मिळू शकते, मात्र त्याचा वापर स्वतंत्र विचारशक्ती कमी करण्यासाठी नव्हे तर संशोधन, नवकल्पना आणि कठीण समस्यांवर उपाय शोधण्यासाठी व्हावा, असे त्यांनी सांगितले. वित्तीय व्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेसमोरील सायबर धोक्यांचा उल्लेख करत, एआय आणि क्वांटम आधारित सुरक्षित तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताची शून्याचा शोध, संख्या पद्धती आणि खगोलशास्त्रातील समृद्ध परंपरा अधोरेखित करत, हा वैज्ञानिक वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर अधिक सक्षम करण्यासाठी देश कटिबद्ध असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.

