ठाणे : मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये मुद्रित झालेले उपनगरीय रेल्वे तिकीट गुजराती भाषेत असल्याचा दावा समाजमाध्यमांवर केला जात आहे. हे तिकीट डोंबिवली ते घाटकोपर अशा प्रवासाचे असून ६ मार्चला ते मुद्रित झाले होते. मुद्रित करण्यात येणाऱ्या यंत्रामध्ये (प्रिंटर) बिघाड झाल्याने अशी तिकीट प्राप्त झाली आहे. तसेच हे तिकीट गुजराती भाषेत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे तिकीट आता माध्यमावर प्रसारित होत प्रवाशांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. मध्य रेल्वे मार्गावरून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करतात. येथील डोंबिवली स्थानकातील एक तिकीट सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या तिकीटावरील भाषा गुजराती असल्याचा दावा काही प्रवाशांकडून केला जात आहे. डोंबिवली ते घाटकोपर दरम्यानचे हे तिकीट असून या प्रकारामुळे आता समाजमाध्यमावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
तिकिटाविषयी काही नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याप्रकाराविषयी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरकारवर टीका करत आहेत. तर, भाजप आणि महायुतीचे समर्थक हे तिकीट गुजराती भाषेत नसल्याचा दावा करत आहेत. तिकीट मुद्रित करणाऱ्या यंत्रात बिघाड झाल्याने अशी तिकीट प्राप्त झाल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. तसेच तिकीट गुजराती भाषेत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.