रत्नागिरी : कोकणातील उद्योग व रोजगार निर्मितीसाठी दोन मोठे जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सील तसेच टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड असे दोन वेगवेगळे सामंजस करार करणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी दौऱ्यावर केली आहे. इतकेच नाही तर कोकणातील राजापूर येथील बहुचर्चित ठरलेला रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की, ”रिफायनरी होणार” असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. रत्नागिरी येथील विशेष कारागृहातील स्वा.वि.दा. सावरकर कोठडीचे सुशोभिकरण आणि बंदीसाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नुतनीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व नूतन वसाहत इमारतीचा भूमिपूजन सोहळाही त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
”देशातला मोठा जेम्स अँड ज्वेलरीचा पार्क नवी मुंबई येथे तयार करत आहोत. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सील व उद्योग विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार प्रत्येक वर्षी ५०० कुशल मनुष्यबळ निर्माण करुन स्थानिकांना जेम्स अँड ज्वेलरी व तत्सम उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे यासाठी अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रेन आणि कार्यकारी अध्यक्ष निरव भंसाली यांच्यात करार झाला आहे”, असं फडणवीस म्हणाले. ”दुसरा करार टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्यावतीने उपाध्यक्ष सुशीलकुमार आणि उद्योग विभाग, एमआयडीसीच्या वतीने प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांच्यात करार झाला आहे. प्रतीवर्ष ७ हजार कुशल मनुष्यबळ निर्माण करुन स्थानिकांना उद्योग व विविध व्यवसायांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे यासाठी हा करार करण्यात आला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी जवळपास पावणे तीनशे कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती फडणवीसांनी दिली. तसेच काजू उत्पादकांच्या अन्य प्रश्नावर कृती कार्यक्रम करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कारागृहातील स्वा.वि.दा.सावरकर यांच्या कोठडीला भेट दिली. या ठिकाणच्या सावरकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन फडणवीस यांनी वंदन केले. नंतर त्यांच्या छायाचित्र दालन आणि हस्तलिखिताची पाहणी केली. फॉरेन्सिकमध्ये राज्याला नंबर वन आणणार. बँका, नॉन बँकींग, फायनान्शियल डिस्ट्रीब्युटर, रेग्युलेटर, सोशल साईटस एकाच प्लॅटफॉर्मवर असतील. सायबर गुन्हा घडला, विशेषतः पैशांच्या बाबतीत फ्रॉडची घटना घडली की, तासाभरात पैसे थांबवून ते परत मिळतील. असा चांगला प्लॅटफॉर्म करण्याचे काम सुरु आहे. हा देशातला सर्वोत्तम प्लॅटफॉर्म असणार आहे. यातून सायबर सुरक्षा मिळेल. कोकणात पायाभूत सुविधा, नवीन मानकं तयार करण्यावर शासनाने मोठा भर दिला आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहत नुतन इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार योगेश कदम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधूरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, बाळ माने आदी उपस्थित होते.