ठाणे : शेजारी राहणाऱ्या इसमाने साडेतीन वर्षाच्या मुलाला मुंबईत अवघ्या साठ हजार रुपयात विकले असल्याची खळबळजनक घटना शांतीनगर परिसरातील रामनगर येथे घडली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शांतीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या साहाय्याने अवघ्या बारा तासात मुलाचा शोध घेत याप्रकरणी शेजाऱ्यासह इतर दोन जण असे तिघांना अटक केली असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली आहे. मोह. युनूस अमिनुद्दिन शाह (वय ५३ वर्ष रा. रामनगर झोपडपट्टी, भिवंडी), पिर मोह. रफिक अहमद शाह (वय ३९ वर्ष) व समसुद्दीन मुख्तार शाह (वय ४५ वर्ष दोघे रा. सेवक नगर, साकी नाका कुर्ला ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिनही आरोपींची नावे आहे.
अमन हरवल्याप्रकरणी त्याचे वडील मो. वदुद हलीम उल्लाह अंसारी वय २७ वर्ष यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रारदाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीचा बंदोबस्त असतानाही मुलाच्या शोधण्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या. तपासात घराशेजारील मोहम्मद युनूस शहा यांनी साडेतीन वर्षाच्या मुलाला हॉटेलमध्ये नेऊन खाऊ दिले व सोबत नेल्याची सीसीटीव्ही फुटेज समोर आले. त्यानंतर शांतीनगर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवून अवघ्या १२ तासाच्या आत मोहम्मद युनुस शहा यास ताब्यात घेत त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने मुलाचे अपहरण केल्याची व मुलाला कुर्ला येथील पीर मोहम्मद रफीक अहमद शहा यास दहा बारा वर्षांपासून मूल होत नसल्याने त्याला मुलाला ६० हजार रुपयात विकल्याची कबुली दिली. शांतीनगर पोलिसांनी त्वरित कुर्ला येथून पिर मोह. रफिक अहमद शाह, समसुद्दीन मुख्तार शाह या दोघांना अटक करून त्यांच्या तावडीतून साडेतीन वर्षांच्या अमनची सुटका करून त्यास आई वडिलांच्या ताब्यात दिले. सदरचा तपास शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, सर्जेराव पाटील, पो. हवालदार संतोष मोरे, संतोष पवार, रिजवान सय्यद, महाले, पोलीस नाईक किरण जाधव, दिनेश भुरकूड, पोलीस शिपाई रोशन जाधव, प्रशांत बर्वे, मनोज मुके, दीपक सानप, रवी पाटील यांच्या पथकाने केली आहे