मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी आवश्यक अशा नऊ मेट्रो गाड्यांमधील शेवटची, नववी मेट्रो गाडी अखेर शुक्रवारी मुंबईत दाखल झाली. आता लवकरच पहिल्या टप्प्यादरम्यान चाचण्यांना (ट्रायल रन) सुरुवात होणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे कामे सुरू आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. त्यासाठीच आता काही दिवसातच या मार्गिकेवरील विविध चाचण्यांना सुरुवात करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळविता येणार आहे. दुसरीकडे पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक अशी शेवटची नववी मेट्रो गाडीही शुक्रवारी मुंबईत दाखल झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील एका कारखान्यात मेट्रो ३ च्या गाड्यांची बांधणी केली जात आहे. पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी नऊ मेट्रो गाड्यांची आवश्यकता होती. आता या सर्व नऊ गाड्या मुंबईतील आरे कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. आता लवकरच मुंबईकरांना भुयारी मेट्रोतून प्रवास करत येणार आहे.