राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाचा दिवस उजाडणार आहे. याचे कारण म्हणजे असे की कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. एवढेच नाहीतर महागाई भत्त्यामध्येही लवकरच वाढ होणार आहे.
देशामध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी आणि २५ इतर राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय ६० वर्षे इतकं आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय ६० वर्षे करावं, अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला याबाबत आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय ६० वर्षे करण्याचा निर्णय सरकार लवकरच घेऊ शकतं.
मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक संपन्न झाली. पदाधिकारी आणि प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीचं वय ६० वर्षे करण्यासंदर्भात आश्वासन दिलेलं आहे.
यासोबत महागाई भत्ता वाढवण्याचं आश्वासनदेखील सरकारकडून देण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरुन ५० टक्के केला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५० टक्के करावा, अशी मागणी संघटनेने केली.
महागाई भत्ता वाढवण्याच्या अनुषंगाने राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी प्रस्ताव तयार केला आहे. तो प्रस्ताव शासनाने तत्परतेने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. मागच्या अनेक वर्षापासून निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी संघटनांकडून होत आहे. आता मुख्यमंत्री याबाबत कधी निर्णय घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.