ठाणे : शाळकरी मुले नशेच्या विळख्यात अडकत चालली आहेत. शाळेच्या आसपास असलेल्या पान टपऱ्यांमधून ई-सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह ड्रग्जची विक्री होत असून ड्रग्ज तस्करांचा शाळांच्या परिसरात वावर वाढला आहे. तस्कर मुलांना ड्रग्ज पुरवत असून अभ्यासू मुले ड्रग्जकडे वळू लागली आहेत. मुलांच्या दप्तरांमध्ये नशेच्या गोळ्या, गुटख्याच्या पुड्या, सिगारेट आढळत आहेत, असे ठाणे शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. शाळांमध्ये ये-जा करणाऱ्या मुलींची छेड काढली जात असल्याची गंभीर बाबही शिक्षकांनी पोलिस अधिकाऱ्यांसमोर अधोरेखित केली. ड्रग्जच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती आणि ड्रग्जविक्रीला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्यातील महाजनवाडी येथील एका हॉलमध्ये ठाणे शहरातील शाळा, कॉलेजचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्लासचे संचालक आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पोलिस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील आणि अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते. पानटपरीवर मिळणारी नशेची गोळी सेवन करून विद्यार्थी शाळेत येतात. शाळेतही ही मुले नशेत असतात. काही वेळेला या मुलांना जबरदस्तीने शाळेत बोलवण्याची वेळ येते, अशी परिस्थिती शिक्षकांनी मांडली. काही मुले वर्गात नशेच्या गोळ्या आणत असून त्या गोळ्या अन्य मुलांना देतात. परिणामी शाळकरी मुले ड्रग्जच्या विळख्यात सापडत आहेत, असेही सांगण्यात आले. काही अशी ठिकाणे आहेत की, तेथे गैरप्रकार चालत असून शाळेपासून काही अंतरावर असलेल्या पानटपऱ्यांमधून ई-सिगारेटची विक्री होते. शाळकरी मुलांकडे ई-सिगारेट आढळून आल्या आहेत. त्यामुळे पानटपऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षकांनी केली.
पानटपरीवर टुकार मुले उभी असतात. ही मुले शाळेत ये-जा करणाऱ्या मुलींची छेड काढत असल्याचे एका शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितले. शाळकरी मुले सिगारेट ओढत असून मुलांच्या दप्तरातही सिगारेट, गुटख्याच्या पुड्या असतात. असे प्रकार वाढत असल्याबाबत शिक्षकांनी चिंता व्यक्त केली. शाळांच्या आसपास असलेल्या पानटपऱ्यांमध्ये गुटखा अन्य प्रतिबंधित पदार्थ असतात. हे पदार्थ विद्यार्थ्यांकडे मिळत असून पाचवीच्या एका मुलाकडे सिगारेट सापडल्याचे यावेळी शिक्षकांनी सांगितले. शाळेच्या परिसरात काही तस्कर फिरत असतात. ते विद्यार्थ्यांना ड्रग्जची विक्री करत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. एमडीसह अन्य ड्रग्जची विक्री होत असून यावर प्रतिबंध घालावा, शाळांच्या परिसरात गस्त घालण्यासह टपऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या मुख्याध्यापक, शिक्षक, खासगी क्लास चालकांनी केल्या. अशाच प्रकारचा उपक्रम दीड वर्षापूर्वीही घेतला होता. त्यावेळी शाळा, कॉलेजचे शिक्षक, पदाधिकारी यांना बोलावले होते. तेव्हा आपण एक संकल्पना मांडली होती. प्रत्येक पोलिस ठाण्यात शाळा आणि पोलिस ठाणे यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी एक महिला पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. या अधिकाऱ्याला तुम्ही माहिती द्या. तसेच, नशेचा विळखा दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. तुम्ही आम्हाला सूचना, माहिती द्या. आम्ही नक्की कारवाई करू, अशी ग्वाही यावेळी पोलिस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.