मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकलच्या मालडब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या ३११ प्रवाशांची धरपकड करून आरपीएफने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. रात्रकालीन न्यायालय चालवून या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून प्रवाशांकडून ४६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कल्याण, टिटवाळा, बदलापूर, पनवेल, ठाणे, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली येथे गर्दीच्या वेळी विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याबद्दल भारतीय रेल्वे कायद्यातील कलम १५५ अंतर्गत १९७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कलम १४७ नुसार रेल्वे परिसरात घुसखोरी केल्याप्रकरणी ९९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रेल्वे परिसरात अनधिकृतपणे फिरणे, भीक मागणे याप्रकरणी १३ जणांविरुद्ध, रेल्वे सेवकाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे परिसरात मद्यपान करून उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विभागीय रेल्वे दंडाधिकारी, कल्याण यांच्या रात्र न्यायालयात दृकश्राव्य प्रणालीद्वारे एकूण ३११ प्रवाशांवर खटला चालवण्यात आला. या प्रवाशांकडून एकूण ४६,९५० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.