वृत्तसंस्था : पाकिस्तानातील Lahore शहरात दहशतवादी संघटना Lashkar-e-Taiba शी संबंधित असलेला अमीर हमजा याच्यावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. Amir Hamza हा संघटनेचा संस्थापक सदस्य तसेच Hafiz Saeed याचा निकटवर्तीय मानला जातो. सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या कारवर अंदाधुंद गोळीबार केला. हा प्रकार लाहोरमधील पैको रोड परिसरातील पिंडी स्टॉपजवळ घडल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या वेळी हमजा स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन घरी परतत होता. या हल्ल्यात त्याच्या हाताला गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला.
या घटनेनंतर हमजावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्याला पोलिसांच्या संरक्षणाखाली घरी हलवण्यात आले आहे. गोळीबाराच्या वेळी त्याच्यासोबत कारमध्ये असलेले निवृत्त न्यायाधीश Nazir Ahmed हे सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. लष्कर-ए-तोएबाशी संबंधित राजकीय संघटना पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगने सोशल माध्यमांवर हमजाचा फोटो शेअर करत तो सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. मात्र लाहोर पोलिसांकडून त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
