डोंबिवली : भाड्याने घेतलेल्या दुकानातील भिंतीला छिद्र पाडून त्यातून शेजारच्या सराफाच्या दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी ७५ लाखाचा सोने, चांदीचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. अतिशय नियोजन करून ही चोरी करण्यात आली आहे, असे विष्णुनगर पोलिसांनी सांगितले. पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावर रत्न सागर सराफाचे दुकान आहे. दुकानाच्या बाजुला रिकामा असलेला एक गाळा दोन ते तीन तरूणांनी भाड्याने घेतला होता. आपण या ठिकाणी मोमोजचा व्यवसाय करतो, असे ते दाखवत होते. ते मुळचे झारखंड येथील रहिवासी आहेत.
गुरुवारी मध्यरात्री या तरूणांनी गाळ्याच्या भिंतीला छिद्र पाडले. त्यामधून ते सराफाच्या दुकानात शिरले. तेथून ११० किलो सोने, चांदीचे दागिने लुटून त्यांनी पोबारा केला. शुक्रवारी सकाळी सराफा दुकानाचे मालक दुकान उघडून दुकानात गेले, तेव्हा त्यांना ऐवज चोरीला गेल्याचे समजले. ही चोरी बाजुला व्यवसाय करत असलेल्या तरूणांंनी केली असल्याचा संशय दुकानादाराने व्यक्त केला आहे. चोरी झाल्यापासून तरूण फरार झाले आहेत.