ठाणे : सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन कोटी दोन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण आता सायबर गुन्हे शोध पथकाकडे वर्ग केले जाणार आहे. फसवणूक झालेले ५९ वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी घोडबंदर भागात वास्तव्यास आहेत. ते शेअर बाजारात पैसे गुंतवित असतात. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या टेलीग्राम या ॲपमध्ये एक संदेश प्राप्त झाला होता. या संदेशावर त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाऊनलोड झाले. तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामाविष्ट करण्यात आला. ॲपमध्ये त्यांची माहिती नोंद करण्यास सांगण्यात आली. त्यानुसार त्यांनी माहिती नोंद केली.
काही दिवसांनी त्यांना संबंधित ॲपमधून काही शेअर खरेदी करण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी तीन कोटी दोन लाख रुपयांचे शेअर टप्प्याटप्प्याने खरेदी केली. परंतु त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेतील परतावा त्यांना मिळत नव्हता. त्यांनी याबाबत व्हॉट्ससंदेश ॲपमधील व्यक्तींना पाठविला. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. संबंधित ॲप शेअर बाजाराचे नसून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली.