मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच राज्यात शून्य अपघात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींची संख्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे होत असल्याचे निदर्शनास आले असून एकूण अपघाती मृत्यूच्या संख्येत दुचाकीस्वारांचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे. त्यामुळे दुचाकीस्वारासह त्यांच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक, वाहतूक कार्यालयाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आता वाहतूक पोलिसांनी या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचबरोबर परिवहन विभागानेही राज्यात शून्य अपघात मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती केली आहे. राज्यात दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांच्या अपघाती मृत्यूंची संख्याही अधिक आहे.
विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवाशाच्या विरोधात मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १२८ आणि १२९ अंतर्गत पोलिसांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी हेल्मेटचा वापर बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहे. परिणामी, दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशाला हेल्मेट घालणे बंधनकारक असून, ते नसल्यास कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहेत. पूर्वी दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर विनाहेल्मेटविषयक कारवाई करताना ई-चलन यंत्रामध्ये दोन्ही प्रकरणांसाठी एकच गट होता. त्यानुसारच कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व विनाहेल्मेट सहप्रवाशाची स्वतंत्र माहिती उपलब्ध होत नव्हती. आता ई-चलन यंत्रामध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि विनाहेल्मेट सहप्रवासी अशा दोन वेगवेगळ्या गटाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. परिणामी, दोघांवरील कारवाईची स्वतंत्र माहिती उपलब्ध होणार आहे.