नवी दिल्ली : CBSE दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, देशभरातील सुमारे २५ लाख विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल जाहीर होताच अधिकृत वेबसाइट्सवर प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याने अनेकदा सर्व्हर डाऊन होणे किंवा वेबसाइट क्रॅश होण्याच्या समस्या निर्माण होतात. एकाच वेळी लाखो विद्यार्थी निकाल पाहण्याचा प्रयत्न करत असल्याने पोर्टल संथ गतीने चालते किंवा काही वेळेस पूर्णपणे बंद पडते. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी पर्यायी माध्यमांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत वेबसाइटवर अवलंबून न राहता इतर डिजिटल पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर DigiLocker हे एक प्रभावी आणि सोयीस्कर माध्यम म्हणून समोर आले आहे. डिजिलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थी आपली डिजिटल गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे सहजपणे डाउनलोड करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी आधीच डिजिलॉकरवर आपले खाते सक्रिय करून ठेवणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणेकडून याबाबत सूचना जारी करण्यात आली असून, निकालाच्या वेळी कोणताही विलंब टाळण्यासाठी आगाऊ तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे APAAR आयडी नाही, त्यांनी घाबरून जाण्याची गरज नसून ते त्यांच्या शाळेकडून मिळालेल्या ॲक्सेस कोड आणि आवश्यक तपशीलांच्या आधारे cbseservices.digilocker.gov.in या संकेतस्थळावर जाऊन खाते तयार करू शकतात. तर APAAR आयडी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका थेट ‘Issued Documents’ या विभागात उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही तांत्रिक अडचणींशिवाय आपला निकाल वेळेवर पाहू शकतील.
डिजीलॉकरवर अकाउंट कसे सक्रिय करावे?
- digilocker.gov.in वर जा.
- ‘Get Started’ वर क्लिक करा.
- शाळेतून मिळालेल्या एक्सेस कोड आणि आपले डिटेल्स भरा.
- मोबाईल नंबर आलेल्या ओटीपीवरून व्हेरिफाय करा. त्याची पडताळणी करा.
- अकाउंट एक्टिव्ह होईल आणि रिझल्ट येताच तुम्हाला मार्कशीट मिळेल.
- दरम्यान निकाल तपासण्यासाठी तुम्हाला या पाच गोष्टींची आवश्यकता असेल, रोल नंबर, स्कूल नंबर(School Number) , प्रवेशपत्र आयडी (Admit Card ID), जन्मतारीख (Date of Birth) , सुरक्षा पिन.
अधिकृत वेबसाइट cbsc.gov.in व्यतिरिक्त तुम्ही results.nic.in, उमंग ॲप आणि SMS/IVRS सुविधेद्वारे देखील तुमचे गुण तपासू शकता. मे महिन्यात होणाऱ्या सत्र २ परीक्षेचा निकाल CBSE लवकरच जाहीर केला जाणार आहे. मागील अनेक वर्षांच्या ट्रेंडनुसार १०वीचा निकाल एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. दरम्यान, सीबीएसई बोर्डाचा १२वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

