ठाणे : मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात चक्रमान्यांची गौरसोय होऊ नये, याकरिता ठाणे परिवहन सेवेसह एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. याकाळात ठाणे परिवहन सेवेने अतिरिक्त बसची सुविधा ठाणे ते मुलुंड आणि ठाणे दिवा अशी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी ५० अतिरिक्त बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर, ठाणे एसटी विभागाकडून देखील कल्याण, ठाणे येथून भिवंडी, नाशिक, पूणे आदी मार्गवर अतिरिक्त २२ बस सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्मची रुंदी वाढण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा मेगाब्लॉक ३० मे मध्यरात्री पासून सुरू होणार असून २ जून पर्यंत असणार आहे.
या कालावधीत चाकरमान्यांची गौरसोय होवू नये, याकरिता ठाणे परिवहन विभागासह एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून या तीन दिवसात रोज अतिरिक्त ५० बस उपलब्ध करुन देणार आहे. सध्या परिवहनच्या ताफ्यात ३५० बस असून त्या व्यतिरिक्त या बस उपलब्ध असणार आहेत. परंतु या ५० बस मुलुंड ते ठाणे आणि ठाणे ते दिवा या मार्गावर सोडल्या जाणार असल्याची माहिती परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली. रेल्वे कडून आलेल्या पत्रानुसार या मार्गावर बस सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या तीन दिवसांच्या कालावधी ठाणे एसटी विभाग देखील सज्ज झाला आहे. एसटी विभागाकडून कल्याण ते ठाणे, ठाणे ते कल्याण, ठाणे ते पूणे, ठाणे ते भिवंडी, खोपट (ठाणे) ते नाशिक, वंदना (ठाणे) ते पूणे या मार्गावर रोजच्या बस व्यतिरिक्त अतिरिक्त २२ बस उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती ठाणे एसटी विभागाने दिली.