पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाची पाळेमुळे खोल रुतली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. धंगेकर यांनी सोमवारी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली.ससून रुग्णालयातून ललित पाटील अमली पदार्थ विक्री करत होता. या प्रकरणात शेवते नावाचा दलाल मध्यस्थ होता. शेवते याने ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि पोलीस अधिकाऱ्यांना पैसे दिले, असा आरोप धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. पुणे शहरात विद्यार्थ्यांना आमली पदार्थ विक्री करण्यात येत आहे. अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी. ललित पाटील प्रकरणाची पुणे पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि आणि दोषींवर कडक कारवाई करावी, असे धंगेकर यांनी सांगितले.