पुणे : पुणे विमानतळ हे देशातील सर्वाधिक धुके असलेले विमानतळ ठरले. या खराब हवामानाचा फटका विमानसेवेला बसला. पुणे विमानतळावर येणारी विमाने दुसरीकडे वळविण्यात आली तर अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. पुणे विमानतळ परिसरात सकाळी मोठ्या प्रमाणात धुके होते. त्यामुळे सर्वसाधारण दृश्यमानता ५० मीटरवर आली. याचवेळी धावपट्टीची दृश्यमानता १५० मीटरवर आली. त्यामुळे सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास इंडिगोचे दिल्ली-पुणे हे विमान मुंबईला वळविण्यात आले. याचबरोबर विस्ताराचे दिल्ली-पुणे विमानही मुंबईला वळविण्यात आले. प्रामुख्याने दिल्लीहून येणाऱ्या विमानांना फटका बसला. दिल्लीहून येणाऱ्या सुमारे ५ विमानांना विलंब झाला. याचवेळी पुण्यातून विविध शहरांत जाणाऱ्या सुमारे ८ विमानांच्या उड्डाणाला विलंब झाला.
विमाने दुसरीकडे वळविण्यात आल्याची अथवा विलंब होत असल्याची माहिती विमान कंपन्यांकडून प्रवाशांना वेळेत देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. विस्तारा कंपनीने समाजमाध्यमावर याबाबत घोषणा केली. परंतु, विमानतळावरील डिजिटल माहिती फलकांवर याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, अशी तक्रार अनेक प्रवाशांनी केली. देशभरातील विमानतळांमध्ये पुणे विमानतळावर शुक्रवारी सकाळी सर्वाधिक धुके दिसून आले. यामुळे पुणे विमानतळावरील सर्वसाधारण दृश्यमानता सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ५० मीटरवर आली होती. याचवेळी धावपट्टीची दृश्यमानता १५० मीटवर आली होती. चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त हवा आल्याने धुके निर्माण झाले. पुणे-बंगळुरू या विमानाला १२० मिनिटांचा विलंब झाला. परंतु, पुणे विमातळावरील डिजिटल फलकांवर याची माहिती देण्यात आली नव्हती. याबाबत चौकशी करण्यासाठीही तिथे कर्मचारीही उपलब्ध नव्हते. पुणे विमानतळावरील सेवा अतिशय खराब आहे.
रेल्वे सेवालाही धुक्याचा फटका
धुक्यामुळे रेल्वेसेवेला सुमारे आठ तासांचा फटका शुक्रवारी बसला. सोलापूरनजीक मोहोळ ते मलिकपेठ, दौंड ते पारेवाडी, दौंड ते श्रीगोंदा, दौंड ते केडगाव, मसूर ते कोरेगाव, सालपे ते वाल्हा या भागात लोहमार्गावर रात्री १ वाजून १० मिनिटांपासून सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत धुके होते. त्यामुळे धुके निवळल्यानंतर आठ तासांनी रेल्वे वाहतूक सुरू झाली. याचा फटका बसल्याने अनेक गाड्यांना विलंब झाला.