ठाणे : स्वच्छतेचा संदेश हा विद्यार्थ्यांमार्फत अतिशय लवकर पोहोचतो आणि त्यांनी केलेली जनजागृती ही परिणामकारक ठरते. त्यामुळे, स्वच्छता ही सेवा या अभियानातील त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी ‘स्वच्छ भारत दिवसा’निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. विद्यार्थी साखळी, चित्रकला आणि निबंध स्पर्धा, टाकावूमधून टिकावू निर्माण करण्याची स्पर्धा यात विद्यार्थ्यांंचा लक्षणीय सहभाग होता. त्यांच्या माध्यमातून प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्तीचा संदेश घरोघरी पोहोचतो आहे. त्यातूनही स्वच्छतेची चळवळ आकाराला येत असल्याचेही रोडे यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनात, ठाणे महापालिकेने १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हा स्वच्छता ही सेवा पंधरवडा, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांनी साजरा केला. जनसहभाग, सफाई मित्रांसाठी सुरक्षा शिबिरे आणि कचऱ्याच्या ठिकाणांपासून मुक्तता या तीन भागात पंधरवड्यात कार्यक्रम करण्यात आले. त्याच अनुषंगाने, बुधवारी स्वच्छ भारत दिवसही महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात सफाई कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, शिक्षक, कलाकार यांच्या सहभागातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास, माजी ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ भोईर, उपायुक्त (घनकचरा) मनीष जोशी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे उपस्थित होते.
विविध शालेय स्पर्धांमधील विजेत्या शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यात, रॉयल ब्लॉसम इंग्रजी शाळा, ज्ञानपीठ विद्यालय, डीडीएम इंग्रजी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, शरद मोरे इंग्रजी शाळा, दुर्गा विद्यामंदिर, सेंट जॉन शाळा यांचा समावेश होता. या कार्यक्रमात, सुजाता कांबळे, मनीषा दगडे, कुर्माया इतिकला, जामुनी नंदे, नंदकुमार मणवे, योगेंद्र जाधव, जसू बारिया, लता लोखंडे, संध्या वाघमारे या स्वच्छता चॅम्पियन्सचा सत्कार करण्यात आला. तसेच, अॅक्शन फॉर ठाणे समूहाचे समीर लिमये, उल्हास कार्ले, उत्सव स्वच्छतेचा या कार्यक्रमाचे श्रीपाद भालेराव, विजय बोधनकर, स्वच्छ सायक्लोथॉन आयोजित करणारे चिराग शहा, शालिनी राठोड, सुबप्रित नारू यांचाही सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्रतिनिधी, समर्थ भारत व्यासपीठचे सुरेंद्र वैद्य आणि भटू सावंत, स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रिया हांडे आणि माया यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी, एकेएफ या संस्थेच्या कलाकारांनी स्वच्छतेचा संदेश देणारे परिणामकारक पथनाटय सादर केले. तसेच, उपस्थितांनी स्वच्छता प्रतिज्ञा घेतली. राजेंद्र पाटणकर यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले.