ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला. भिवंडी तालुक्यातील तळवली या ग्रामपंचायतीमध्ये संत गाडगेबाबांच्या व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस प्रकल्प संचालक अतुल पारस्कर, पंचायत समिती भिवंडीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर, ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली, ग्रामपंचायती मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. “स्वच्छ भारत दिवस” या दिनाचे औचित्य साधून तळवली ग्रामपंचायत मधील नवीन सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ग्रामस्थांनी स्वच्छता प्रतिज्ञा घेतली. समारोप कार्यक्रम आज, २ ऑक्टोबर रोजी प्रत्येक गावात स्वच्छ भारत दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून स्वच्छ माझे अंगण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कुटुंबांना सन्मानित करण्यात आले.
या मोहिम अंतर्गत ४३१ ग्रामपंचायत अंतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी जसे सार्वजनिक स्थळे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, नद्यांचे किनारे, रस्ते आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात आली. या श्रमदान उपक्रमात स्थानिक नागरिकांसह एनएसएस, एनसीसी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, विविध मंडळे आणि शासकीय कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
तालुका आणि जिल्हास्तरावर स्वच्छतेशी संबंधित विविध उपक्रम राबवण्यात आले असून १७ सप्टेंबर ते १ आक्टोंबर या कालावधीमध्ये दर दिवशी गाव स्तरावर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले आहेत. मोहिमेत ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ आयोजित करून सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आले.
गावागावात एक झाड आईच्या नावे उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने एकल प्लास्टिकविरोधी अभियान राबवले असून, लोकांना प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.