पुणे प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदीचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते आज शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन केले जाणार होते. तसेच त्यानंतर स.प. महाविद्यालयाच्या मौदानावर जाहीर सभा होणार होती. मोदींचा पुणे दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित दौऱ्यात मोदींचे पुणे विमानतळावर 4 वाजण्याच्या सुमारास आगमन होणार होते. त्यानंतर ते शिवाजीनगर स्थानकावर येऊन मेट्रोने शिवाजीनगर ते स्वारगटे असा प्रवास करणार होते. भुयारी मार्गाचे लोकार्पण केल्यानंतर मोदी वाहनाने स.प महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल होणार होते. येथे मोदींची जाहीर सभा पार पडणार होती.
मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्यात मेट्रोसह एकूण 12 प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. तसेच मोदी भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करणार होते. मात्र पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींचा पुणे दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
आजही पावसाचा मुक्काम कायम राहणार असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.