ठाणे प्रतिनिधी : प्रतिवर्षी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ‘स्वच्छता पंधरवडा’ सर्वत्र साजरा केला जातो. या पंधरवड्यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा 2024’ ही देशपातळीवरील महापालिकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अनुषंगाने ‘स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना घेवून ठाणे महापालिका व विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘उत्सव स्वच्छतेचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 ते 9.30 दरम्यान कोरम मॉल ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
ठाणे महापालिकच्या या उपक्रमात उत्सव ठाणे च्या माध्यमातून एकत्र आलेल्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था मिळून स्वच्छता या विषयावर मनोरंजनातून प्रबोधनपर कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात नामवंत फॅशन मॉडेल सोबत कचरावेचक महिला, त्यांची मुले, सफाई कर्मचारी, सिग्नल शाळेचे विद्यार्थी यांना घेऊन सादर होणारा फॅशन शो असणार असून व्ही आर व्हेंचर आणि रोहन्स एरा यांच्या सहकार्याने सदरचा कार्यक्रम होणार आहे.
त्याचप्रमाणे कलांकुर संस्थेची नृत्यनाटिका, गौरी व सौरव शर्मा यांचे कथ्थक नृत्य, वर्षा ओगले यांचे भारुड, पथनाट्य असे विविध कार्यक्रम यावेळी सादर होणार आहे. टाकाऊ वस्तूंच्या वापरातून तयार केलेली वाद्यांच्या सहाय्याने स्वत्त ठाणे ड्रम सर्कल व इंडियन एज्युकेशन सोसायटीचे वास्तुशास्त्र महाविद्यालय ‘कबाड बँड’ ही अनोखी संकल्पना सादर करणार आहेत. तसेच ‘आगाऊ पोरे’ या स्टँड अप कॉमेडीचे कलाकार अथर्व हिंगणे यांच्या पुढाकाराने खास स्वच्छता या विषयावरील स्टॅड अप शो सादर करणार आहेत.
ठाणे महापालिकेसमवेत ‘स्वत्व ठाणे, ए.आर व्हेंचर्स, रोहन्स एरा, आगाऊ पोरे, कलांकुर, स्त्री मुक्ती संघटना, समर्थ भारत व्यासपीठ, काशी कला मंदिर, इंडियन एज्युकेशन सोसायटी वास्तुशास्त्र महाविद्यालय’ या संस्था सहभागी झाल्या असून कोरम मॉलने व्हेन्यू पार्टनर म्हणून कार्यक्रमास जागा उपलब्ध करुन दिली आहे.
ठाणे महापालिका व ठाणेकर नागरिकांनी दरवर्षी अनोख्या संकल्पना सादर करुन राष्ट्रीय पातळीवर बक्षीसे प्राप्त केली आहेत. यंदाही ‘उत्सव स्वच्छतेचा’ या उपक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या ठाणे शहराला पहिल्या क्रमांकावर नेण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.