जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बुधवारी रात्री खालावल्याने राजकीय घडामोडींना वेग आला. आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि सरकारच्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. आपण कोणत्याही राजकीय भूमिकेतून नव्हे, तर ‘भाऊ’ म्हणून भेटण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेदरम्यान मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना लाड यांनी ५८ लाख कुणबी नोंदी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीवर लावण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले. या नोंदींच्या आधारे पात्र अर्जदारांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल. संपूर्ण प्रक्रियेचे नियमित निरीक्षणही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात जात पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले. याशिवाय मराठा-कुणबी कक्ष, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, ओबीसींना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना तसेच नोकरी नियुक्त्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी उपोषण मागे घेण्याचे आणि किमान पाणी पिण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रसाद लाड यांनी स्वतःच्या हाताने जरांगे पाटील यांना पाणी पाजले. मात्र, पाणी स्वीकारले असले तरी उपोषण मागे घेतलेले नसून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी कायम ठेवली.
सरकारच्या आश्वासनांनंतरही मनोज जरांगे पाटील यांनी सातारा आणि कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटबाबत शासन निर्णय (जीआर) जारी झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. हा जीआर काढून तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीबाबतही त्यांनी सरकारला प्रश्न विचारत जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेली सहा जात प्रमाणपत्रांची प्रकरणे मार्गी लावण्याचे आव्हान दिले. तसेच मराठा आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अन्यथा संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठा समाजातील सुमारे ३५० तरुणांना पीएसआय पदावर नियुक्ती मिळालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांना तातडीने नियुक्ती देण्याची मागणीही त्यांनी केली. मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती लागू कराव्यात आणि भरलेली फी परत करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली. चर्चेनंतर प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची प्रकृती पाहून आपण रात्री झोपू शकलो नसल्याचे सांगत त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यावर जरांगे पाटील यांनी, “दोन दिवसांत काम झाले नाही तर सलाईन काढून फेकू, पण उपोषण मागे घेणार नाही,” असा इशारा दिला. पाणी पाजल्याबद्दल त्यांनी प्रसाद लाड यांचे आभार मानले, मात्र सरकारने सातारा-कोल्हापूर गॅझेटचा जीआर जारी करून इतर मागण्यांवर ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. त्यामुळे सरकारच्या आश्वासनांनंतरही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पेच कायम असून अंतरवाली सराटीतील पुढील घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

