मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल ९२ लाख महिलांना अपात्र ठरवल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला असून, त्याच्या निषेधार्थ सोमवार, १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, सरकारने पात्र महिलांना अन्यायकारक पद्धतीने योजनेबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने डिजिटल पडताळणी आणि ई-केवायसी मोहिमेनंतर लाभार्थ्यांची फेरतपासणी केली. या प्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणावर महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली. विरोधकांचा दावा आहे की, अपात्र ठरवण्यात आलेल्या अनेक महिला प्रत्यक्षात योजनेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या असून, पडताळणी प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांना लाभापासून वंचित राहावे लागले. या निर्णयामुळे राज्यभरातील महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारने तातडीने फेरपडताळणी करून पात्र महिलांना पुन्हा योजनेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ५० ते ५५ लाख महिलांनी मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले. याशिवाय १२ ते १६ लाख महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे किंवा त्या आयकरदाते असल्याचे आढळून आले. जवळपास ४.५ लाख शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर त्यांनाही लाभार्थी यादीतून वगळण्यात आले. तसेच ६५ वर्षांवरील सुमारे ४.५ लाख महिला आणि ‘नमो शेतकरी’सह इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या सुमारे ५ लाख महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे. या व्यापक पडताळणीमुळे योजनेतील लाभार्थ्यांची संख्या सुमारे २.६ कोटींवरून १.५३ ते १.६५ कोटींवर आली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर लाभार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारने मात्र पडताळणी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्याचा दावा केला असून, केवळ निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, आजच्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले असून, या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
