मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात उत्सवाची लगबग सुरू असताना अन्नपदार्थांमध्ये भेसळ, अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) ॲक्शन मोडवर आले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीच सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर मुंबईतील मिठाई विक्रेते, केटरर्स आणि विविध गणेश मंडळांनीही प्रशासनाच्या या भूमिकेचे स्वागत करत नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. लालबाग येथील प्रसिद्ध मिठाई विक्रेते तानाजी वाडेकर यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी FDAची कारवाई आवश्यक असल्याचे सांगत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे मत व्यक्त केले. ग्राहकांना दर्जेदार आणि सुरक्षित प्रसाद तसेच मिठाई उपलब्ध करून देणे ही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. लालबागमधील आणखी एक मिठाई विक्रेते राम यादव यांनीही यंदा उच्च दर्जाच्या मिठाईची विक्री करण्याचा संकल्प व्यक्त करत अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन करणारे मुंबईतील केटरर्सही अधिक सतर्क झाले आहेत. लालबाग येथील सागर केटर्सचे मालक सागर बंदीवाडेकर यांनी गेली पाच वर्षे गणेश गल्ली गणपती मंडळासाठी महाप्रसादाची व्यवस्था करत असल्याची माहिती देत ताजे अन्न, ताज्या भाज्या, दूध आणि पनीर यांचाच वापर केला जात असल्याचे सांगितले. कमी खर्चासाठी निकृष्ट किंवा शिळे पदार्थ वापरणाऱ्या काही व्यावसायिकांमुळे विषबाधेच्या घटना घडतात, मात्र दर्जेदार खाद्यपदार्थ वापरणे हीच खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सागर बंदीवाडेकर यांनी पुढे सांगितले की, महाप्रसाद वाढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हातमोजे, मास्क आणि टोपी वापरणे अनिवार्य केले असून स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. तुकाराम मुंढे यांच्या घोषणेला भीती म्हणून नव्हे तर जबाबदारी म्हणून स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. चेंबूर येथील पापाजी केटर्सचे मालक चंद्रकांत देशमुख यांनीही FDAच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देत स्वच्छता आणि हायजिनबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. गणेश मंडळांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. परळचा महाराजा गणेश मंडळाचे सरचिटणीस प्रतीक कदम यांनी महाप्रसाद आणि भंडाऱ्यातील अन्न सुरक्षित राहावे यासाठी आवश्यक परवानग्या घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मात्र ऑनलाइन परवानगी प्रक्रियेत विलंब होत असल्याने FDAने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची सुविधाही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांमध्येही या निर्णयाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. स्थानिक नागरिक अक्षय खराडे यांनी उत्सवाच्या काळात प्रसाद आणि भंडाऱ्यातील भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे सांगत तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचे स्वागत केले. सणासुदीच्या काळात लाखो भाविक प्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घेत असल्याने अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे ही प्रत्येक विक्रेता, केटरर्स आणि गणेश मंडळाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. FDAच्या या मोहिमेमुळे उत्सव काळात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

