चित्रपटसृष्टी : दिवंगत पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा पंडित जसराज यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून मधुरा यांची प्रकृती ठीक नव्हती. मधुरा चित्रपट निर्मात्या, लेखक आणि संगीत प्रेमी होत्या. वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ४ वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मधुरा पंडित जसराज यांनी दोन चित्रपट केले होते. अनेक माहितीपट दिग्दर्शित केले आणि शास्त्रीय संगीताशी संबंधित अनेक संगीत अल्बममध्ये योगदान दिलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांची त्या कन्या होत्या. त्यांचा विवाह 1962 मध्ये पंडित जसराज यांच्याशी झाला होता. 1954 मध्ये एका संगीत कार्यक्रमात दोघांची भेट झाली होती. पंडित जसराज यांचं ऑगस्ट २०२० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.
पंडितजींच्या कला अभ्यासासोबतच मधुरा यांनी स्वत:च व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी कठोर श्रम घेतले होते. त्यांनी पती पंडित जसराज यांच्यासोबत अनेक माहितीपट आणि नाटकांचं दिग्दर्शन केलं होतं. इतकेच नाही तर मधुरा यांची त्यांचे वडील व्ही शांताराम आणि पती पंडित जसराज यांच्यावर एक डॉक्युमेंटरी बनवून एक पुस्तकही लिहिलं होतं. ‘आई तुझा आशीर्वाद’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. याशिवाय अनेक संगीत अल्बममधून त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला आकार दिला. मधुरा यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.