गुहागर विशेष प्रतिनिधी : मागील तीन वर्षांपासून ग्रामपंचायत पालशेत निवोशी कार्यालयातील कारभाराबाबत सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या मनमानी कारभारामुळे पालशेत वासीयांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला आहे. नुकतंच पालशेत ग्रामपंचायत सरपंच यांना आपल्या कर्तव्यात कसूर व व्यवहारातील अनियमीतता निदर्शनास आल्याने सरपंच या पदावरून पायउतार व्हावं लागलं ही अत्यंत लाजिरवाणी बाब समोर आली आहे. नेहमीच सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत इतर सदस्य यांच्यात दोन गट पडल्याचे वारंवार निदर्शनास आले. त्यामुळे पालशेत मधील अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकले नाही.
पालशेत ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार सर्वांसमोर आणणारे माजी सदस्य मिनार पाटील यांच्याजवळ चर्चा केली असता असे निदर्शनास आले की, मागील साडेतीन वर्षांमध्ये स्मशानभूमीतील लाकडे साठविण्याच्या गोडावून बांधण्याचे कामात, १५% मागासवर्गीय निधी खर्ची घालण्यात, निवोशी भेलेवाडी नळपाणी पुरवठा योजनेच्या कामामध्ये, प्राथमिक शाळा शौचालय दुरुस्ती कामात अशा अनेक कामात ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी व वरिष्ठ अधिकारी, ठेकेदारांना हाताशी धरून सर्व व्यवहारात अपहार करत दुय्यम दर्जाचे काम करीत असताना आपल नाव मात्र कुठेही येणार नाही याची अत्यंत शिताफिने काळजी या रिमोटने घेतली. अशा या रिमोटने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या भैय्यावर टिपणी केल्याने शिवसैनिक मिनार पाटील यांनी सांगितले की, ज्याने जनतेतून निवडून आलेल्या महिला सरपंच यांना अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरून मानसिक त्रास देऊन राजीनामा देण्याची वेळ आणली, हे पालशेत मधील जनतेला कस काय चालते? तसेच स्वतःला शिवसैनिक समजणाऱ्या सदस्याने पालकमंत्र्यांनी जी जनसुविधे अंतर्गत विकास कामे दिली होती ती स्वतःला मिळावी यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांजवळ हा भ्रष्ट रिमोट लाळघोटेपणा करत होता. अशा या लखोबाने शिवसेनेच्याच पालकमंत्र्यांच्या भैय्यावर बोलणे हे खेदजनक बाब आहे आणि ते कदापिही सहन केले जाणार नाही. त्याच बरोबर पालशेत ग्रामपंचायत मधील शाळा शौचालय दुरुस्ती घोटाळ्यातील दोषींवर अजून कारवाई होणे बाकी आहे आणि ह्या सर्वाला हा रिमोट जबाबदार आहे. त्यामुळे आता स्वतःच्या रिमोट कंट्रोलने ग्रामपंचायत पालशेत मधील चालविलेल्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल झाल्याने रिमोटला तोंड लपवण्याची वेळ आली आहे.