पनवेल : जाहिरात फलक व्यवस्थित दिसावेत, यासाठी रस्त्यालगतच्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोहचून शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे. याकडे पनवेल महापालिकेच्या पर्यावरण, उद्यान, परवाना विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील अधिकृत जाहिरात फलकांपैकी जास्तीत जास्त फलक हे सायन-पनवेल महामार्गावरील रस्त्यांच्या कडेला आहेत. हे जाहिरात फलक व होर्डिंग दिसण्यासाठी त्यांची सर्रासपणे कत्तल सुरू असून झाडे होल्डिंगच्या आड येऊ नयेत म्हणून त्यांची वाढ होऊ न देता कापण्याची तीन वर्षांतील ही पाचवी वेळ आहे.
पनवेल महापालिका व सरकारकडे वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून सिमेंटच्या जंगलात हिरवाई नष्ट होत असून पनवेलचे तापमान वाढत आहे. सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल ते कामोठे या ठिकाणी रस्त्यालगत आठ डेरेदार वडाची झाडे अर्ध्या भागातून कापली आहेत. सायन-पनवेल मार्ग हा कायमस्वरूपी रहदारीने गजबजलेला असल्यामुळे या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक आहेत. तसेच या मार्गाच्या कडेला वड, पिंपळ यासारखे मोठे वाढणारे वृक्ष लावण्यात आले आहेत. परंतु या वृक्षांची वाढ झाल्यानंतर ते जाहिरात फलकांच्या आड येत असल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी झाडे अर्ध्यातून छाटली जात आहेत व त्यांची वाढ खुंटत आहे. रस्तारुंदीकरणानंतर या मार्गालगत मोठ्या प्रमाणावर वटवृक्ष व पिंपळाच्या झाडे लावण्यात आली आहे; परंतु या रस्त्यालगत असलेल्या जाहिरात फलकामुळे या झाडांचे भवितव्य अंधारात आहे.