पालघर : वाहनांची ओळख अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि छेडछाडमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविणे अनिवार्य केले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने तब्बल सहा वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, तरीही पालघर जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार ८२९ वाहनांवर अद्याप एचएसआरपी बसविण्यात आलेली नाही. फॅन्सी नंबर प्लेट किंवा छेडछाड केलेल्या क्रमांकांमुळे ई-चलन कारवाईत अडथळे निर्माण होतात, तसेच गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या वाहनांचा माग काढणेही कठीण होते. त्यामुळे परिवहन विभागाने उच्च सुरक्षा क्रमांक पाटी सक्तीची केली आहे. पालघर जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची एकूण ४ लाख ७८ हजार ९३१ वाहने असून, त्यापैकी २ लाख १२ हजार १०२ वाहनांवर एचएसआरपी बसविण्यात आली आहे. हे प्रमाण ४४.४८ टक्के इतके असून उर्वरित मोठ्या संख्येने वाहनधारकांनी अद्याप नियमाचे पालन केलेले नाही.
एचएसआरपी बसविण्यासाठी ३० एप्रिल २०२५, ३० जून २०२५, १५ ऑगस्ट २०२५, ३० नोव्हेंबर २०२५, ३१ डिसेंबर २०२५ आणि अखेर ३० जून २०२६ अशी सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही अनेक वाहनधारकांनी दुर्लक्ष केल्याने आता प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष पथके नेमून कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३ हजार २४२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून ३२ लाख ४२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पुढील काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी आणि वाहनांची सुरक्षित ओळख सुनिश्चित करण्यासाठी वाहनधारकांनी तातडीने अधिकृत केंद्रावरून उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
