पालघर : पालघर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना दर्जेदार पूर्वशालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी आणि इतर मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाकांक्षी विद्युतीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील १,२३५ अंगणवाड्यांमध्ये लवकरच वीजपुरवठा सुरू होणार असून अंधुक प्रकाशात कार्यरत असलेल्या केंद्रांमध्ये उजेडाची सुविधा उपलब्ध होईल. पालघर जिल्ह्यात एकूण २,८१४ अंगणवाड्या कार्यरत असून त्यामधून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना पूर्वशालेय शिक्षण, पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण तसेच माता-बाल आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जाते. यापूर्वी जवळपास एक हजार अंगणवाड्यांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून काही केंद्रांमध्ये सौरऊर्जेवर आधारित वीज व्यवस्था तसेच ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद शाळांमधून वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजनेतून ३.३९ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पात पालघर, मनोर, वसई, वाडा, डहाणू, कासा, विक्रमगड, मोखाडा, जव्हार आणि तलासरी परिसरातील अंगणवाड्यांचा समावेश असून प्रत्येक केंद्रात वीज जोडणी, एलईडी दिवे, पंखा, मॉड्युलर स्विच, प्लग पॉइंट आणि तांब्याच्या वायरिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच काही अंगणवाड्यांमधील विद्युत प्रणालीचे नूतनीकरण सामाजिक दायित्व निधीतून करण्यात येणार असून भविष्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रत्येक अंगणवाडीसाठी दरमहा ५०० रुपयांची वीजबिलाची तरतूदही करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे बालकांसाठी अधिक सुरक्षित, उजळ आणि आधुनिक शिक्षणाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.
