वृत्तसंस्था : भारतातील ऑन-डिमांड सेवा देणाऱ्या आघाडीच्या प्लॅटफॉर्म स्विगीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ‘शेवटच्या टप्प्यातील वितरणाला बळ’ या संकल्पनेवर आधारित इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) वाहतूक परिषदेचे आयोजन केले. या परिषदेत इलेक्ट्रिक वाहन उत्पादक, चार्जिंग व बॅटरी स्वॅपिंग सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, वाहन ताफा भागीदार, वित्तीय संस्था आणि डिलिव्हरी भागीदार सहभागी झाले. शेवटच्या टप्प्यातील वितरणासाठी इलेक्ट्रिक दुचाकी हा परवडणारा आणि व्यवहार्य पर्याय कसा ठरू शकतो, यावर सविस्तर चर्चा झाली. स्विगीने विविध भागीदारांच्या सहकार्याने देशभरातील २५ इन्स्टामार्ट पॉड्सवर बॅटरी स्वॅपिंग केंद्रे सुरू केली असून, त्याच ठिकाणी डिलिव्हरी भागीदारांना इलेक्ट्रिक वाहने भाड्याने घेण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ऑर्डर उचलण्याच्या ठिकाणीच वाहन आणि बॅटरी बदलण्याची सुविधा मिळाल्याने वेळेची बचत होऊन अधिक डिलिव्हरी करणे शक्य होणार आहे. स्विगीचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी यांनी डिलिव्हरी भागीदार हे कंपनीच्या सेवांचे केंद्रबिंदू असल्याचे सांगत त्यांच्या दैनंदिन कामातील अडचणी कमी करण्यासाठी अशा सुविधा विकसित केल्याचे स्पष्ट केले.
स्विगीच्या कॉर्पोरेट अफेअर्स प्रमुख नेहा सिंघवी यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा व्यापक स्वीकार वाढवण्यासाठी परवडणारा वित्तपुरवठा, विश्वासार्ह चार्जिंग व बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क तसेच पूरक सरकारी धोरणांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. परिषदेत इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात मोलाचे योगदान देणाऱ्या इंडोफास्ट एनर्जी, युलू, बाऊन्स डेली, RIDEV, बाज बाइक्स, मोटव्होल्ट, शॅडोफॅक्स, बीगॉस ऑटो, वीलो मोबिलिटी, हाला मोबिलिटी आणि युमा एनर्जी यांसह अनेक भागीदारांचा गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डिलिव्हरी भागीदारांचाही सत्कार करण्यात आला. बाऊन्सचे सह-संस्थापक वरुण अग्नी यांनी या उपक्रमामुळे वाहन नसलेल्या रायडर्सनाही सहजपणे इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध होत असल्याचे सांगितले. तर स्विगीचे डिलिव्हरी भागीदार उमेश यांनी स्विगी ॲपद्वारे परवडणाऱ्या दरात ईव्ही भाड्याने घेऊन पॉडवरच बॅटरी बदलण्याची सुविधा मिळत असल्याने वेळ, खर्च आणि श्रम वाचून अधिक कमाई करण्यास मदत होत असल्याचा अनुभव व्यक्त केला. या उपक्रमामुळे शेवटच्या टप्प्यातील वितरण अधिक कार्यक्षम, पर्यावरणपूरक आणि डिलिव्हरी भागीदारांसाठी अधिक फायदेशीर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
