ठाणे : ठाणे महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक किंवा महापालिका कार्यालयात जाण्याची गरज आता राहणार नाही. ज्येष्ठ पेन्शनधारकांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने ‘टीएमसी लाइफ सर्टिफिकेट डिजिटल सिस्टिम’ हे ॲप सुरू केले असून, या माध्यमातून पात्र पेन्शनधारकांना घरबसल्या डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. त्यामुळे प्रवास, बँकांमधील गर्दी आणि रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होणार असून ज्येष्ठ नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असते. मात्र, वयोमान, आजारपण किंवा शारीरिक अडचणींमुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष बँकेत जाणे कठीण होत होते. अनेकांना यासाठी कुटुंबीयांवर अवलंबून राहावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने बँक ऑफ महाराष्ट्र आणि भारतीय स्टेट बँकेच्या सहकार्याने ही डिजिटल प्रणाली विकसित केली आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली या सुविधेचा शुभारंभ महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आला. या प्रणालीमुळे पेन्शनधारकांना मोबाईलद्वारे सहज जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार असून, त्याची डिजिटल पडताळणी आणि नोंद ठेवण्याची सुविधाही महापालिका प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुरक्षित होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरबसल्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनावश्यक धावपळ टाळता येणार असून, महापालिकेच्या डिजिटल प्रशासनाला देखील बळ मिळणार आहे. भविष्यात अशा नागरिकाभिमुख सेवांचा अधिक विस्तार करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

